दर्शनाला आलात?
या..पण या देवालयात,
सध्या देव नाही
गाभारा आहे,
चांदी चे मखर आहे,
सोन्याच्या समया आहेत,
हिर्यांची झालर आहे.
त्यांचं ही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा,
आणि असे इकडे या
पाहिलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तसं नाही,
एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा,
शेज आरतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन,
बरोबर बाराला जेवायचा,
दोन तास वामकुक्षी घ्यायचा,
सारं काही ठीक चालले होतं.
रुपयांच्या राशी,
माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी.
दक्षिण दरवाज्याजवळ,
मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.
सारे काही घडत होते.. हवे तसं
पण एके दिवशी..आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी तारस्वरात ओरडला
“बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा!
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे.
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्यांच्या वस्तीत,
तो राहिला असेल तर,
तर त्याला पुन्हा..प्रवेश द्यावा की नाही,
याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना.
पत्रव्यवहार चालू आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
पण तूर्त गाभार्याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर,
गाभार्याचे महत्व अंतिम असतं.
कारण गाभारा सलामत,
तर देव पचास.
- कुसुमाग्रज
ता.क. - कुसुमाग्रजांना भेटता आलं नाही हे माझं दुर्भाग्य, नाहीतर ह्या कवितेसाठी आणि त्या मागच्या विचारासाठी साष्टांग दंडवत घातलं असतं त्यांना!
असो, जिथे कुठे असाल तुम्ही, घातलं असं समजा!
हीच कविता ऐका इथे 11व्या मिनिटा पासून , खरं तर अख्खा कार्यक्रम ऐका,
मुक्काम पोस्ट कुसुमाग्रज