"मी कविता का लिहितो?"
ह्या प्रश्नाला तसा काहीच अर्थ नाही, जसा "माणूस का
बोलतो?" ह्या प्रश्नाला नाही तसाच. मला व्यक्त व्हावंस
वाटतं आणि मी तो कवितांमधून होतो. कविताच का? गद्य ,निबंध, लघु कथा का नाही? माहीत
नाही, मला कविता होते म्हणून मी कविता लिहितो. तशी असतील ही
कारणं, पण आता पर्यन्त ती मी शोधायचा प्रयत्न केला नाही.
कविता मला पहिले आठवते ती बडबड गीत म्हणून. लहान असताना आई, बाबा आणि अण्णानी ऐकवलेली. तीच बडबड गीतं कुठे तरी आहेत खोल वर पेरलेली. आठवायला सांगाल तर कदाचित
आठवणार ही नाहीत पण त्यांचा काही तरी अंश रेंगाळत आहे कुठे तरी. कदाचित एकदम माझ्या मुलाला, नातवाला ऐकवीन आता ती .
माझं प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं. शाळेत आम्ही हिन्दी शिकलो पण मराठी नाही. त्या मुळे मराठीचा
वापर घरी बोली भाषा म्हणून व्हायचा. आई मराठी ध्वनिफिती नक्की आणायची मला ऐकवायला. त्यात पुन्हा काही बडबड गीतं, लहान मुलांच्या
गोष्टी होत्या, वेगवेगळ्या मोठ्या कलावंतांच्या आवाजातल्या. अश्या दिग्गज कलावंतांच्या
आवाज ऐकताना मस्त वाटायचं. त्यातला जो आवाज अजूनही आठवतो तो म्हणजे सुलभा
देशपांड्यांचा. त्या आवजांचे माझ्या मनावर नक्कीच ठसे राहिले आहेत, म्हणून कदाचित मी आज ही कविता लिहिताना, स्वतःशी बोलत, स्वतःला वाचून दाखवत असतो.
इयत्ता पाचवी मध्ये मी पुण्याला शिकला गेलो ज्ञान प्रबोधिनी मध्ये. त्या शाळेत मराठी हे एक शिकवायचं माध्यम होतं. आता मराठी ही बोली
भाषा न राहता, लिहायची आणि शिकायची भाषा झाली. पुण्याचं मराठी हे 'साजूक तुपातलं' म्हणून ओळखलं जातं, त्याचा माझ्या मुंबईच्या 'अस्वच्छ' भाषेवर प्रभाव झाला आणि माझ्या भाषेला अजून एक पैलू लाभला. पाचवी ते आठवी मराठी
शिकलो तेव्हा कविता म्हणजे काय, हे हळू हळू समजू लागलो. आमच्या शिक्षिका, अनुराधा ताई, चारुता ताई आणि पूर्वा ताई, खूप छान शिकवायच्या. तेव्हाची जी कविता आठवते ते म्हणजे बाल कवींची 'गवतफुला'. अनुराधा ताईंनी त्या कवितेला ला छान चाल
लावलेली. ती कविता अजूनही, शब्द विसरलो असलो तरीही, गुणगुणत रहावीशी वाटते. तेव्हा कधी तरी लिहायला लागलो. एकदा लिहायची
म्हणून सात पानांची कविता लिहिलेली, कवितेचं शीर्षक आणि विषय, अजून काय असणार "मी"!
ह्या मध्ये सातवी-आठवी मध्ये सौमित्र आणि मिलिंद इंगळे ची 'गारवा' ही ध्वनिफीत
प्रकाशित झाली. माझं, पाऊसाचं आणि कवितेचं नातं त्यातल्या
कवितांमुळे आणि गाण्यांमुळे अजून पक्कं झालं. पण अजून माझी पहिली पावसाळी किंवा
पावसा बद्दल ची कविता व्हायला काही वर्षं लागली, पण संस्कार
हे नक्की 'गारवा' चेच आहेत.
पुढे परत कविता सुटली, कारण की
व्यक्त व्हायला मी 'नाटक' हे माध्यम
निवडलं. त्यात वाचिक अभिनय भरपूर केला, काही नाटकं शाळेत
लिहिली व दिग्दर्शित ही केली आणि मराठी भाषेशी एक कलाकार म्हणून अजून जवळ येत गेलो.
अकरावी मध्ये कधी तरी कविता पुन्हा भेटली आणि भेटली, ती तरुण वयातलं पहिलं
प्रेम वगैरे घेऊनच! तेव्हा पुन्हा शब्द, कवितांच्या मार्गे कागदा वर उतारू लागले. तेव्हाची
कविता म्हणाल्या बरोबर डोळ्या समोर उभा राहिला तो म्हणजे,
शिवाजी पार्क इथला राखाडी खाडी वजा समुद्र, त्याचा तो घमघमाट आणि अंगावर उडलेले काही खारट तुषार . माझ्या कविते वर माहीम च्या
समुद्राच्या लाटांचे ही असंख्य फेसाळेले आणि राखाडी संस्कार आहेत.
तेव्हाच्या माझ्या कविता, मी एका मैत्रिणीला वाचून दाखवल्या.
तिने वाचल्यानंतर, कवितांची चोपून टीका केली, तिला जाणवलं की माझ्या कवितेत अजून खूप सारे प्रश्नच आहेत, उत्तरं मात्र नाहीत. बहुदा माझी तेव्हा ची कविता ही माझ्याच मनस्थिती चं
प्रतिबिंब होती, ज्यात भरपूर प्रश्न होते उत्तरं मात्र मिळत नव्हती.
तिची टीका तेव्हा कळली नाही पण आता मागे वळून बघतो तेव्हा पटते.
पुण्याला बायरामजी जीजीभोय वैद्यकीय महाविद्यालयात असताना भरपूर लिहिलं. पुण्याच्या घरी माझं टेबल
खिडकी ला लागून होतं. पाऊस चालू झाला की मृद्धगंध दरवाळायला लगायचा आणि मी पार
मुग्ध होऊन लिहीत जायचो. माझ्या पहिल्या पावसाळी कवितेवर, 'गारवा' चा सौमित्र च्या कवितांचा विशेष प्रभाव आहे. पाऊस आणि कविता हे नातं त्या
टेबला जवळच्या खिडकीने आणखी घट्ट केलं. बरसणारे थेंब थोडे ऐकत थोडे झेलत, एका अपूर्ण पण नितांत सुंदर कविते कडे मनातच बघत राहावसं वाटायचं. नकळत तीच कविता मनातून निसटून कधी
कागदावर जाऊन बसायची ते कळायचं नाही. नितांत सुंदर, देखणी, ओढ लावणारी आताच पावसात भिजून आलेल्या प्रेयसी सारखी.
मी कविता करत नाही, मला
कविता होते. मला आज कविता करायची आहे असं ठरवून, मारून मुटकून लिहायला बसलो की कविता नाही उतरत कागदावर. कविता आधी मनात
घर करून बसते, चटकन एखादं अत्तर दरवळावं तशी मनात दरवळत
राहते. ते अत्तर केवढं सुंदर आहे, हे सांगायला शब्दांचा मात्र
आधार होतो आणि मग कविता बघता बघता, होऊन जाते.
होणे, हे क्रियापद मी "मूल होणे" या अर्थी ही वापरतो आहे. कधी
कधी ते व्हायला वेळ लागतो, त्रास होतो.
पुरुष असल्या मुळे, जरी प्रसूती वेदना अनुभवता येणार नसल्या
तरी त्या कवी म्हणून भरपूर प्रसूती वेदना अनुभवल्या आहेत आणि तसाच नवनिर्मिती चा आनंद ही!
पहिले नमूद केल्या प्रमाणे, मराठी ही माझी सर्व प्रथम बोली भाषा
आहे, म्हणून मी पहिले कविता बोलतो. नाटकवाला असल्या मुळे मला
कवितेतही नाट्य असणं, त्यातून एखादी गोष्ट सांगणं महत्वाचं वाटतं.
कविता अशीच, स्वतःशी बोलता बोलता लिहितो. म्हणूनच माझी कविता
मला वाचून दाखवायला जास्त आवडते, तिची पडती बाजू सांभाळून मी
घेतो आणि काही खास जागा आणखी खुलवून मांडू शकतो. माझी कविता वाचायला कशी वाटते ते
मला नक्की माहीत नाही.
माझी कविता, वृत्तात बसत नाही. मात्रा, लघु गुरु तिला कळत नाहीत, कधी कधी ताल मात्र धरते आणि मुक्तछंद होऊन बेधुंद नाचते कागदावर आणि मी
फक्त धुंद होऊन बघत राहतो .
एक धागा ह्या सगळ्यात समान आहे तो म्हणजे मी हळवा झालो, की लिहितो. मनात काही लागलं की लिहितो.
काही कवितांमध्ये लिहिताना जाणवतं की जखम वाटली होती त्याच्या पेक्षा बरीच खोल आहे
आणि मग शब्द भळा-भळा वाहत येतात कागदावर. कविता कधी रडायला खांदा देते, कधी हात होऊन डोळे पुसते, मांडी ही होते कधी आणि
थोपटून झोपायला लावते, कधी अनुभव होते कविता आणि चार समजुती
च्या गोष्टी शिकवून जाते. मनाची खरी सखी आहे कविता गुंफून हातात हात, चालत राहते, चालत राहते.
शेवट तात्यासाहेबांच्या,
वि. वा. शिरवाडकरांच्या काही शब्दांनी करतो म्हणजे अजून काही कविते बद्दल लिहायलाच
नको. तात्यासाहेब म्हणतात -
मी शब्दांच्या घालून बसतो अमाप राशी,
जखमी होता धावत जातो शब्दांपाशी,
शब्दच झाले मालक आता सर्व जिण्याचे,
जानवराने काबिज केला हा दरवेशी !
आम्हा घरी आहे शब्दांचेच धन,
खंत नाही त्याची जाणवते पण,
शब्द देता घेता झाले आता शब्दांचेच मन,
झाले आता शब्दांचेच मन !